खुलताबाद, (प्रतिनिधी): श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदगिरी, महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेरूळ येथे कथाकार राधाकृष्ण महाराज यांच्या शिवमहापुराण कथा महोत्सवास शुक्रवार (दि. १०) पासून उत्साहात सुरुवात झाली असून कथाश्रवणाचा हजारो भाविक लाभ घेत आहेत.
ही कथा शुक्रवार (दि. १७) पर्यंत चालणार आहे. अन्नपूर्णा कैलास आश्रमाचे उत्तराधिकारी स्वामी अभयानंदगिरी महाराज यांनी या कथा महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवामध्ये सकाळी चार ते सहादरम्यान काकडा भजन, ९ ते १२ दरम्यान होमहवन, चार ते पाच हरिपाठ, सायंकाळी पाच ते आठ वाजेदरम्यान शिवमहापुराणकथा होणार आहे.
सर्व भाविकांसाठी संध्याकाळी आठ ते दहा वाजेदरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे. अन्नपूर्णा कैलास आश्रमाचे उत्तराधिकारी अभयानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या (मंगल कार्यालयात) डोममध्ये होत असून, जोधपूर (राजस्थान) येथील कथाकार गोवत्स राधाकृष्ण महाराज शिवपुराणकथा कथन करत आहेत.
या शिवमहापुराण कथेस जगद्गुरू शांतिगिरी महाराज वेरूळ, आचार्य महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी महाराज (विलेपार्ले), सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, विठ्ठल आश्रम आळंदी, देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांच्यासह देशभरातील संत-महंत उपस्थित राहात आहेत.











